श्री महालक्ष्मी माहात्म्य
|
|
श्रीगणेशाय नमः । श्रीलक्ष्मी देव्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः । श्री कुलस्वामिनी नमः नमन माझे श्रीगणेशा । विघ्नेश्वरा श्री जगदिशा । देवी शारदा स्फूर्ति देउनी । देवी माहात्म्य वदवीते ।।1।। लक्ष्मी देवीची ही कथा । व्दापार युगाची सरिता । अखंड वाचता ऐकता । सकल मनोरथ पुरतील ।।2।। सद्गुरु स्मरोनि भावे । संत सज्जना आठवावे । व्रत लक्ष्मीचे ऐकावे । भक्तिभावे भक्ताने ।।3।। सौराष्ट देशीचा राजा । भद्रश्रवा धर्मकाजा । देवव्रती महाज्ञानी । समुद्र स्वामी सत्तेचा ।।4।। राणी सुरतचंद्रिका । सुलक्षणी पिर अभाविका । अष्टापत्यी पती-सेविका । ऐश्वर्या धुंद जाहली ।।5।। श्रीदेवी विचार करी मनी । जावे राजव्दार भुवनी । सखी सुरतचंद्रिके भेटुनी । ओळख द्यावी पूर्वजन्माची ।।6।। महालक्ष्मीने वेश पालटला । वृध्देचा अवतार दिसू लागला । जीर्ण वस्त्रे परिधानुनि चाले । हाती आधार काठीचा ।।7।। राजा नांदे वैभवात । ऐसे देखिले स्वप्नात । पहाया आली अवचित । राणी भेटेल म्हणोनी ।।8।। राजा सुविचारी मनाचा । प्रजा आठवी गुण त्याचा । संतसज्जनही सुवाचा । ब्राह्मणही संतोषती ।।9।। वृध्दा आली राणीगृही । साद घाली आर्त खरी । दासी लगबगा आली बाहेरी । पाहिले रुप निराळे ।।10।। दासी पुसे तिजप्रती । नाव गाव सांगे त्वरिती । काम काय तेही कथी । येथे येणे कायसे ।।11।। कमला आहे माझे नाव । व्दारकेत राहते सदैव । राणीस भेटावे म्हणून । आले चालत तेथूनी ।।12।। पूर्वजन्मी राणीस । व्रत सांगितले होते खास । त्या व्रताची स्मृति देण्यास आज येथे पातले ।।13।। दासी वृध्देसी सांगते । राणी रमली मैत्रिणीते। गप्पा-गोष्टींत मन रमते । भेट कैशी होणार ? ।।14।। तिला सागंता येईल राग । सहवासाचा |
|
होईल भंग । सोडून कैशी येणार सांग । जाय परतुनि म्हातारे ।।15।। म्हातारी मनी कोपली । राणी ऐश्वर्यात मुरली । गर्व झाला तिचे मानसी । धुंदी चढली संपदेची ।।16।। व्रत विसरली पूर्वजन्मीचे । मीच दिले होते साचे । दारिद्य जाता ऐश्वर्याचे । राजवैभवी नांदते ।।17।। पूर्वी होती वैश्य पत्नी । भांडे पतिसवे प्रतिदिनी । वैतागली मार खाऊनी । काय करावे सुचेना ।।18।। रानी-वनी आश्रय केला । जीव नकोसा झाला । दैन्य सोडीना तिला । कर्म भोग तो सुटेना ।।19।। लक्ष्मीदेवी दयावती । सांगतसे तिजप्रती । प्राप्त व्हाया सुख-संपत्ती । लक्ष्मीद्रत आचरी ।।20।। उगवता मार्गशीर्ष मास । प्रथम गुरुवार शुभ दिवस । व्रतारंभ करावा खास । उत्तम मुहूर्त मानुनी ।।21।। श्री लक्ष्मीदेवीचा आदेश । तिने आचरता भावेश । लक्ष्मीदेवी प्रसन्न होत । दैन्य गेले जन्माचे ।।2।। कृपा होता देवीची । धनसंपदा सुखाची । संपली आपदा जीवाची । सुखी झाले कुटूंब ।।23।। दुःख-दैन्य दूर झाले । आनंदाने घर भरले । लक्ष्मीव्रताचे पुण्य भले । जन्म झाला पावन ।।24 दैववशी पुढचे जन्मी । वैश्य पत्नी झाली राणी । वैभव विलास भोगूनी । गर्व चढला तिजलागी । आला उतमात राणीला । वसा घेतला सुटला । लक्ष्मीद्रत करण्याला । आले आठवण द्यावया ।।26 सांगते मला वेळ नाही । गरिबांची तीला गर्वा नाही । तिचे नशिबी सुख नाही । मी परतुनि जाते माघारी ।।27।। इतुके बोलुनि तडतडा । परत निघाली धडधडा । हात जोडी दासी तिला । थांब म्हणे प्रेमाने ।।28।। दारिद्याने मी गाजंले । लक्ष्मीव्रत आहे भले । सांग मला सत्वरे । वसा कोणता व्रताचा ।।29।। वसा कशाला हवा मुली ? सेवा करता पडेल भूली । कोप राणीचा होता क्षणी । तुला देईल हाकलोनी ।।30।। तुझा नाही भरवंसा ।। ऊत येतो माणसा । धन-दौली येता परिसा । स्मृति जाते विसरोनी ।।31।। तूच माझी माय वृध्दे । आण घेते आज श्रध्दे । उतणार नाही शब्द देते । कृपा करी लेकीवरी ।।32।। म्हातारी झाली प्रसन्न । दासीस सांगे व्रतनिया । फल कैसे मिळेल जाण । लक्ष्मीव्रत सांगितले ।।33।। सुरु होता मार्गशीर्ष मास । करी आरंभ गुरुवारास । प्रथम गुरुवार शुभ दिवस । तोच होई शुभकारी ।।34।। पहाटे करुनिया स्नान । निर्मळ असावे तन-मन । जागा स्वच्छ करवून । पाट-चौरंग मांडावा ।।35।। रांगोळी असावी सभोवार । आरास करावी मनोहर । अंतःकरण करोनी स्थिर । पूजे लागीं बसावे ।।36।। चौरंगी ठेवावे धान्य शेर । गहू, तांदूळ उत्तम सार । कलश ठेवावा त्यावर । पाणी भरुन स्वहस्ते ।।37।। वरी ठेवावी आम्रडहाळी । कलशापुढे पान सुपारी । जवळी स्थापावी गणेशाची स्मृती । मूठ तांदळावरील सुपारी ।।38।। कलशावरी ठेवाव नारळ । लक्ष्मीचे चित्रही जवळ । दूध, फळे, विडे ठेवून । पूजा करावी श्रद्धेने ।।39।। धूप, दीप, नेवेद्य आरती । करावी शांत चित्तीं । इच्छा मनीची देवीप्रती । नम्रभावे निवेदावी ।।40।। माते करी क्षमा चुकांची । प्रसन्न मने मार्ग दावूनी । चिंता मनींची घालवोनी । सौभाग्य-सुख लाभावे ।।41।। आरोग्य, संपदा टिको सदा य़ बालिकेला कृपा-प्रसादा । देऊनी पुरवा कोडकौतुका । आस मनीची पुरवावी ।।42।। ऐसी प्रार्थना करुन । सदभावे साष्टांगे वंदून । मिष्टान्न देवीप्रत करुन । नेवेद्य दाखवावा मनोभावे ।।43।। गाईस गोग्रास घालोनी । पुन्हा आरती करोनी । रात्री उपवात सोडोनी । रात्र आनंदे घालवावी ।।44। शुक्रवारी सकाळी करावे स्नान । पूजा करावी विसर्जन । कलशपाणी तुळशीस अर्पून पाने टाका उत्तरेला ।।45।। ऐसा नेम महिनाभर । शेवटी असेल गुरुवार । उद्यापन करोनिया सारं । व्रत सांगता करावी ।।46।। उद्यापनी सात सुवासिनी । कुमारिका तितक्याच आमंत्रुनी । हळदी-कुंकू तयां देऊनी । कहाणी पुस्तक अर्पावे ।।47।। ब्राह्मणास द्यावे वस्त्र एक । शिधा, दक्षिणा, कहाणी पुस्तक । लक्ष्मी देवीचा प्रभाव देख । येईल प्रत्यय नंतर ।।48।। कोणी महिना, कोणी वर्ष । व्रत करता होतो हर्ष । शक्ति-भक्ति तसा संघर्ष । मोद देईल मानवा ।।49।। लक्ष्मी आणि नारायण । प्रसन्न होती भक्ता जाण । व्रत आचरा श्रद्धा ठेवून । लक्षमी माता सागंतसे ।।50।। आकल्पित पडला खंड पुढे चालवी व्रत अखंड । सर्व सोडूनिया पाखंड । भाव-भक्ति विसरु नये ।।51।। व्रत महिमा ऐकून दासी । नमन करी वृद्धेसी । सांगे विश्वासून तिजसी । व्रत करीन निश्चये ।।52।। राणीची हाक पडे कानी । राणी कोपली ते क्षणी । थेरडी कोण भेटली ।।53।। भीक मागते दारोदारी । मार पाठीत लाथ सत्वरी । होकोनी घालवी दूरी । नीघ थेरडे येथूनी ।।54।। म्हातारी बोलली राणीप्रत । वैभवी लोळता झालीस उन्मत । पूर्वजन्मीचा तव वृत्तांत । कैसा विसरलीस ना कळे ।।55।। तुज सांगितले लक्ष्मी व्रत । त्या योगे लाभली धनदौलत । धुंद झालीस मदोन्मत्त । तुच्छा लेखसी जन सारे ।।56।। वृद्धेचे बोल ऐकता । राणी संतापली चित्ता । बोले तिला अव्दातव्दा । ढकलून देई वाटेवरी ।।57।। पूर्वजन्मीचा कसला सांगावा । नको सांगू मला फतवा । पती माझे वीर्यवान बरवा । सामर्थ्य त्यांचे अपूर्व ।।58।। पराक्रमाने शत्रू जिकंले । राज्यवैभव वाढवले । ऐश्वर्याचे लेणे लाभले। ते तुजला कसे कळणार ? ।।59। वृद्धा उठली धडपडून । मनी कोपली दारुण । राणी पुढे पहाशील दुर्दिन । जाते तेथूनि झडकरी ।।60।। राजकन्या शामबाला । पाही माडीवरुन लीला । वृद्धेचा आला कळवळा । आली धावत खालती ।।61।। वृद्धेचा बात धरुनी । बसवी तिला सन्निधानी । चरणी मस्तक ठेवूनी । माता चुकली, क्षमा करी ।।62।। मी तो अज्ञ बालिका । ठेव विश्वास नको शंका । राग सोडूनि निःशंका । शापातुनी सोडवी ।।63।। वृद्धेसी फुटला पाझर । राग सोडला क्षणभर । तुला पाहता नवा अंकुर । मनात या क्षणी ।।64।। तू सुविचारी पोर । तुझे मनही तसे थोर । बैस शेजारी सत्वर । काय देऊ मी तूला ? ।।65।। मी तुझे रुप न जाणता । मी मागणे मागते आता । घरचा ऐश्वर्य दीप तेवता । अखंड राही सर्वदा ।।66।। वृद्धेच्या मनी दया आली । राजकन्येस सांगू लागली । लक्ष्मी व्रताची थोरवी । विसरली राजमाता ।।67।। जागृत तिला करावया । मी आले राणीस भेचावया । तिची उन्मत्त वृत्ती पाहता । जाते येथूनि माघारी ।।68।। तुज देखता वाटे शांती । तूजवरी जडली माझी प्रीती । सोड मनीची तुझी भीती । मागणे काय ते सांग ।।69।। हेतू काय मानसी । तो सांग निःशंक मजती । असा तुझी पुरवायासी । मागशील ते देईन ।।70।। लक्ष्मीव्रत तुज सांगते । ध्यानी घेई निश्चिते । आचरता सुख लाभसे । चिंता दूर सेडूनी ।।71।। वृद्धेने व्रत सांगितले । शामबालेने ऐकले । पुनरपी चरणी नमन केले। लक्ष्मीदर्शन होताची ।।72।। वृद्रधा झाली गुप्त ते क्षणी। शामबाला चकित होऊनी । मज भेटली देवी भवानी । चिंता नुरली मनात ।।73।। पाही त्या दिशेकडे । शामबाला आतुरतेने । पाहता पाहता मन हर्षते । धन्य दिवस आजचा ।।74।। शामबाला निग्रहाने । लक्ष्मीव्रत करी नेमे । खात्री घेतली मनाने । संतोषली मानसी ।।75।। शामबाला झाली उपवर । प्रयत्न करता धुरंधर । यश लाभले तयासी ।।76।। राजकन्येला आली मागणी । सिद्धेश्वर पुत्र सुलक्षणी । मालाधर नामे राजपुत्रासी । विवाह झाला आनंदे ।।77।। चंद्रगिरीचा चंद्रशेखर । तोच हा मालाधर । दोघांचा चालला संसार । सुखानंदी पहुडले ।।78।। देवी सुरतचंद्रिकेवरी कोपली। अकस्मात दैवगती फिरली । शत्रु सैन्याची स्वारी झाली । राज्य गेले तयाचे ।।79।। सात पुत्रही दुरावले । राजाराणी वनवासी झाले । गत जन्माचे पाप उठले । दैवयोग ओढावला ।।80।। राज्य गेले आप्त गेले । मनी फार दुःख झाले । आठवणीने पोखरले । अश्रु येती सारखे ।।81।। आपली कन्या शामबाला । भेटण्या तिला राजा निघाला । जावई आहे उदार भला । दया येईल तयासी ।।82।। जावयास घालीन साकडे । त्याशी मागेन काही थोडे । घरी आणीन ते रोकडे । दिवस जातील सुखात ।।83।। राजा निघाला सत्वरी । जाऊन बैसला नदीतिरी । एक दासी येता तिरी । ओळखले राजाला ।।84।। गेली लगबग वाड्यात । राणीस सांगितला वृत्तांत । मालाधराने वाजत-गाजत । श्वशुरा आणले घरा ।।85।। राजास मानाने आणले । वस्त्रालंकार तया दिधले । शामबालेने गौरविले । पितयालागी ।।86।। राजा राहिला काही दिवस । घरी येण्याची लागली आस । निरोप मागे शामबालेस। जाती बाळे घराला ।।87।। राजा निघाला तेथून । मालाधराने हंडा भरुन । दिल्या मोहरा भेट म्हणून । सोबतीला नोकर ।।88।। राजा घरी येई शांत चित्ते । राणी पाही भद्रश्रवाते । हंडा पाहुनि हर्षते । पाही उघडून घाईने ।।89।। हंडा उघडला आशेने । आत पाहे कौतुकाने । काय पाहिले राणीने । शुद्ध काळे कोळसे ।।90।। भद्रश्रवा अश्रू ढाळी । हात मारी कपाळी । काय आहे आपल्या भाळी । दोघांनाही कळे ना ।।91।। शामबालेने बोलावे । चंद्रिकेने दुःख आवरले । घट्ट मनाने प्रस्थान केले । लेकीकडे जावया ।।92।। येता नदीतिरी चंद्रिका । पाय उठेना पुढे जाया । स्वस्थ होती नेत्र मिटुनी । दासीने ते पाहिले ।।93।। लगबगा येऊनी घरी । शामबालेस भेटली ती नारी । माता तुमची नदीतिरी । डोळे मिटुनी बैसली ।।94।। शामबाला निघाली रथातुनी । आली सत्वर चंद्रिके भेटी । चिंता मातेची ओळखूनी । बावरली क्षणभरी ।।95।। आईस बसविले रथात । रथ वेगे आला परत । आईस उतरवी धरुन हात । आणवी शामबाला ।।96।। आईस स्नान घालूनी । वस्त्रालंकार देउनी य़ मधुर वचने सुखवोनी । ठेवी घरी आनंदे ।।97।। गुरुवार होता त्या दिवशी । मार्गशीर्ष मासीचा पहिला खुशी । शामबाला लक्ष्मी व्रताची । भावे करी सिद्धतचा ।।98।। सर्व तयारी परिपूर्ण होता । पूजाविधी करी व्रता । बाला आनंदली चित्ता । मस्तक टेकवी देवीपुढे ।।99।। पूर्व जन्मीचे स्मरण बोता । चंद्रिका पाही लक्ष्मीव्रता । मस्तक टेकी राणीही त्वरिता । भक्तिभावा स्मरुनी ।।100।। चंद्रिकेने व्रत पुन्हा आरंभले । निरालसे नेम-नियम पाळले । महिन्याअंती उद्यापन केले । गुरुवार तो साधुनी ।।101।। लक्ष्मी झाली पुन्हा प्रतन्न । स्थिती पालटली परीपूर्ण । दिसे सुस्थिती खुलले मन । श्रीलक्ष्मी कृपेने ।।102।। मालाधर बोलवी श्वशुरासी । भद्रश्रवा आला भेटायासी । मालाधर विचार करी मनासी । श्वशुराचे राज्य मिळवाया ।।103।। मनोदय कथिला भद्रश्रवास । सैन्यास पाठवी स्वारीस । शत्रु झाला पराभूत । राज्य मिळिवले शर्थीने ।।104।। भद्रश्रवा सुखावला मनी । परत गेला स्वस्थानी । सर्व प्रजा हरखूनी । गौरव करी राजाचा ।।105।। भद्रक्षवा निष्ठापूर्वक । कर्तव्य करी अमोलिक । राज्य वैभव उजळूनि सोने । चमके नवतेजाने ।।106।। सात पुत्रही घरी आले । आईवडिलांसी भेटले । पुत्रा पाहूनि मन हर्षले । लक्ष्मी कृपेचा प्रभाव हा ।।107।। शामबाला आली भेटाया माहेरा । सकलां पाहता खुलला चेहरा । आठ दिवस राहूनी परते घरा । दिला हंडा घऊनी ।।108।। हंडा घेतला मिठाने भरुन । निघाली निरोप घेऊन । आई-वडिलांना वंदून । आली घरी आनंदे ।।109।। मालाधर विचारी पत्नीला । काय आणिले सांग मला । पत्नी दाखवी हंडा भला । पाहता दिसती मीठ खडे ।।110।। हे काय आणले वेडे । उणे काय माझ्याकडे । काय बोलू सांग तुला गडे । काहीचही सुचेना ।।111।। शामबाला सांगे पतीस प्रेमे । हे आहे सौराष्ट्राचे सेने । समुद्रतिरी राज्य पित्याचे । सागरासारखे विशाल ।।112।। मीठ वस्तू फार गुणी । त्यावी सर्व पदार्थ अळणी । मिठाने चव येते भोजनी । मीठ लक्ष्मी मोलाचे ।।113।। पुरुष स्त्रिया काही भाविक । लक्ष्मीव्रत करिती श्रद्धापूर्वक । वाढे दिगंती लौकिक । निर्मळ गुरुजी सांगती।। 114।। शत्रु, चोर, लुटारु जन । जिथे करिती मीठ-सेवन । निथे राखितां वमान जाण। निश्चयेसी ।।115।। हाती मीठ घेऊनि आण । धन्याचे करिती रक्षण । प्रसंगी करिती प्राणार्पण । ऐसा प्रभाव मिठाचा ।।116।। राजा राणीस लक्ष्मी पावली । सर्व दुःस्थिती दुरावली । लक्ष्मी व्रताची थोरवी । अतर्क्य ती सर्वथा ।।117।। सर्व सुखाचा सागर । लक्ष्मीकृपेचा आधार । सर्वां लाभो निरंतर । हीत प्रार्थना सर्वांची ।।118।। लक्ष्मी देवी मायावती । भक्तां देई सुख-संपत्ती । विसरु नये कुणी चित्ती । स्मरण नित्य ठेवावे ।।119।। नमोSस्तुते महामाये । श्री पीठे सुरपुजिते । शंख-चंक्र-गदा हस्ते । महालक्ष्मी नमोस्तुते ।।120।। कल्पतरु ही लक्ष्मी देवी । दुःख दुरिते दूर घालवी । मनोरथ पूर्ण करी माउली । सर्व भक्तांचे।।121।। |